LATEST NEWS

दिवंगत आमदाराच्या खात्यातून परस्पर पैसे वळविल्याचा आरोप; बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाख

दिवंगत आमदाराच्या खात्यातून परस्पर पैसे वळविल्याचा आरोप; बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाख

बिलोली, ता. २३: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कासराळी शाखेत दिवंगत माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांच्या खात्यातून परस्पर ४० हजार रुपये वैयक्तिक खात्यावर वर्ग केल्याचा प्रकार समोर आला आहे. लेखापरीक्षणादरम्यान एकूण ३ लाख २२ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शाखाधिकारी आणि कॅशियर यांच्याविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कासराळी येथील जिल्हा बँक शाखेत नियमित ऑडिटदरम्यान संशयास्पद व्यवहार आढळून आले. तपासात शाखाधिकारी डी. डी. देशमुख आणि कॅशियर पी. बी. इबीतदार यांनी संगनमत करून विविध खातेदारांच्या खात्यांतून रक्कम त्यांच्या वैयक्तिक खात्यावर वळविल्याचा आरोप आहे.

यामध्ये गोविंद कुलकर्णी, हरिदास नामघटी, इरबा डुबुकवाड, पुंडलिक तर्काटे, रुक्मिणबाई मुके, अहमद पिंजारी, कोंडीबा सायलु यांच्यासह दिवंगत माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांच्या खात्याचाही समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी जिल्हा बँकेचे शाखा प्रमुख राजेश मारोती पाटील यांच्या तक्रारीवरून बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, ऑडिटदरम्यान व्यवहारांमध्ये अनियमितता आढळल्यानंतर ही बाब उघडकीस आली.