कोल्हापुरात महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण
कोल्हापूर, १ मे:
महाराष्ट्र दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त स्वराज्य भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी Dr Vijay Rathod यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या सुरांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी तिरंग्याला मानवंदना देत कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
या सोहळ्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे, उपजिल्हाधिकारी रुपाली चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख तसेच प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस दलाच्या वतीने संचलन करून ध्वजाला सलामी देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर फुलांच्या सजावटीने आणि रोषणाईने सुशोभित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केले.