धारावीतील एन. शिवराज मैदानात वृक्ष संवर्धन दिनानिमित्त स्वच्छता मोहीम संपन्न
मुंबई: धारावीतील एन. शिवराज मैदानात वृक्ष संवर्धन दिनानिमित्त स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृती मोहीम उत्साहात पार पडली. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या मैदानात अधिक स्वच्छता आणि देखभाल व्हावी, या उद्देशाने धारावी नागरिक समिती, झोपडपट्टी पोलीस पंचायत (बीट क्रमांक २), जी-उत्तर उद्यान विभाग आणि घनकचरा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत विविध उपक्रम राबवण्यात आले.
या कार्यक्रमात मैदान स्वच्छता, वृक्षाभोवती झाडलोट, दगड-मातीचा निचरा, वृक्षांना पाणी व खत देणे, तसेच हास्ययोग आणि व्यायाम अशा उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमात परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमासाठी घनकचरा विभागाचे मार्गदर्शक श्री चंद्रकांत तांबे, कनिष्ठ वृक्ष अधिकारी श्रीमती स्वाती शेवडे, तसेच धारावी नागरिक समितीचे मार्गदर्शक दिलीप गाडेकर, अलका साबळे, संदीप ढवळे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर मैदानात नियमावलीचा फलक लावणे, परिसरातील कचरा तात्काळ उचलणे आणि स्वच्छता नियमित ठेवण्याची मागणी नागरिक समितीने प्रशासनाकडे केली. मैदानाचा वापर करणाऱ्या सर्वांनी स्वच्छतेची जबाबदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.