LATEST NEWS

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे वृक्षतोडीवर नियंत्रण; पर्यावरणपूरक विकासावर भर

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे वृक्षतोडीवर नियंत्रण; पर्यावरणपूरक विकासावर भर

विलास केजरकर, भंडारा

भंडारा: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. “अपरिहार्य गरज सिद्ध केल्याशिवाय आणि सखोल तांत्रिक पडताळणीशिवाय कोणतीही वृक्षतोड करण्यात येऊ नये,” असे त्यांनी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले. या निर्णयामुळे पुढील वृक्षतोडीवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे.

फुलमोगरा ते कारधा या मार्गावर कडुलिंब, सागवान, चिंच, पिंपळ, करंजी, बाभूळ, आंबा आणि सिसम यांसारखी अनेक वर्षांपासून उभी असलेली वृक्षसंपदा आहे. उपलब्ध माहितीनुसार, या परिसरातील ११२ झाडांपैकी सुमारे ४५ झाडांची तोड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

स्थानिक नागरिकांनी वृक्षतोडीबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावून प्रकल्प अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर वृक्षतोडीबाबत अधिक काटेकोरपणे निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रशासनाच्या मते, विकास प्रकल्प राबविताना पर्यावरणीय बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. रस्त्याचे चौपदरीकरण हा महत्त्वाचा विकासात्मक भाग असला तरी पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सध्या संबंधित विभागाकडून भूभागाची स्थिती, पाण्याची पातळी आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करून अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून आतापर्यंत करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा आढावा घेतला असून, पुढील कारवाई तांत्रिक अहवालावर आधारित असेल, असे स्पष्ट करण्यात आले.